‘तालमींच्या जागी ‘जीम’ आल्या अन् वस्तादऐवजी ट्रेनरनं सूचना केल्या’

‘तालमींच्या जागी ‘जीम’ आल्या अन् वस्तादऐवजी ट्रेनरनं सूचना केल्या’


चित्रपटातील हिरोची बॉडी पाहून आपणही बॉडी बनवावी अन् टी-शर्ट घालून फिरावं, अशी भावना ग्रामीण भागातील युवकांच्याही मनात येते.

 शहरी वर्गाचं अनुकरण मोठ्या प्रमाणात केलं जातं. मग, ते कपडे घालणं असू, फॅशन करणं असू, खाणं-पीणं असू किंवा बोलणं असू. त्यामुळेच शहरवासियांच अनुकरण ही ग्रामीण भागातील तरुणाईची फॅशन बनली आहे. मात्र, आता ही फॅशन बॉडी बनविणाऱ्या जीमपर्यंत येऊन पोहोचली आहे. कारण, गावातल्या तालिमींची जागा आता जीमने घेतल्याचं दिसून येतंय. तर, तंदुरूस्त शरीर बनवण्यासाठी तालिमीतील व्यायामाऐवजी आधुनिक ‘जीम’ची क्रेझ वाढताना दिसतेय.

चित्रपटातील हिरोची बॉडी पाहून आपणही बॉडी बनवावी अन् टी-शर्ट घालून फिरावं, अशी भावना ग्रामीण भागातील युवकांच्याही मनात येते. त्यासाठी तामिलीत जाऊन घाम गाळणारी पोरं आता, आधुनिक जीमला पसंती देत आहेत. मोकळ्या मैदानात अनवाणी पायांनी पळण्याऐवजी आता कार्डिओ मशिनवर स्पोर्टशूज घालून पळण्यात या पोरांचा रस वाढला आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील तालमी ओस पडू लागल्या असून गागागावात जीमची संख्या वाढत आहे. 

पैलवानांच्या कोल्हापूर अन् सोलापुरातही जीमला पंसती
पैलवानांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरातही जीमची संख्या वाढताना दिसत आहे. तालमीत जाऊन अंगावर माती टाकून कुस्त्या खेळणारी पोरंही, आता जीमला प्राधान्य देत आहेत. तर, बॉडी बनविण्यासाठी आता वस्तादाऐवजी ट्रेनरकडून प्रशिक्षण मिळत आहे. एकूणच ग्रामीण भागात जीमची क्रेझ वाढली असून सोलापूरातही तीच परिस्थिती दिसते. कोल्हापुरात शाहूपुरी, गंगावेश, मोतीबाग, न्यू मोतीबाग या तालमीतच बऱ्यापैकी कुस्तीचा सराव सुरू आहे. इतर तालमींचे नूतनीकरण झाले आहे; पण नूतनीकरण करताना लाल मातीचे आखाडे बंद झाले आहेत. तालमीत आधुनिक व्यायामशाळा आहेत. पैलवानांचं गाव असलेल्या सोलापूरच्या करमाळ्यातही आखाडे ओस पडू लागले आहेत. येथून दंड थोपटण्याचा येणारा आवाजही आता मंदावल्याचं दिसत आहे. चंद्रहास निमगिरे, आताचा बाला रफिक या महाराष्ट्र केसरी विजेत्यांच्या करमाळ्यातही आखाड्यामधील वस्तातऐवजी आता जीममधील ट्रेनरच्या सूचना येऊ लागल्या आहेत. 

जीम अन् पावडरचे फॅड
व्यायामाचे फायदे माहिती असले तरी प्रत्यक्षात ते अंगीकारण्यात तरुणांना वेळ मिळेनासा झाला आहे. जीमचे फॅड या नव्या तरुणाईला लागले असून जीमसोबत पावडर, गोळ्या अन् इंजेक्शनचे डोसही ही तरुणाई घेत आहे. विशेष म्हणजे पारंपारिक तालमीतून कमावलेलं शरीर अन् जीमच्या व्यायामातून बनलेली बॉडी यामध्ये मोठी तफावत आहे. जीमचा व्यायाम बंद केल्यानंतर ही बॉडी काहीसी पूर्वव्रत होते. पण, तालमीत घाम गाळून कमावलेलं शरीर हे दीर्घकाळासाठी साथ देतं, असं तालमीतल्या वस्तादांचं म्हणणं आहे. 

नेत्यांकडे जीम उभारणीसाठी हट्ट
राजकीय नेत्यांनाही कार्यकर्ते एकत्र येण्यासाठी गावागावात तालमी बांधून दिल्या आहेत. तर, तरुण वर्गही आपल्या आमदाराकडे किंवा खासदाराकडे तालिम बांधून देण्याची मागणी व्हायची. मात्र, काळानुसार गावाकडच्या तरुणाईची ही मागणीही बदलली आहे. या तरुणाईलाही आता जीमचे याड लागलं आहे. त्यामुळेच, सरपंचांपासून ते आमदारांपर्यंत ही तरुणाई गावात एखादी जीम असावी, असा हट्ट धरताना दिसून येत आहे. 

Spread the love

Leave a Reply

Close Menu
Translate »